ठाणे,दि.28(जिमाका):- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या पुढाकाराने व पंचवटी फार्म्स, शेगाव यांच्या सहकार्याने दि.24 व 25 मे 2025 रोजी टाऊन हॉल, ठाणे येथे “आरोग्य, अध्यात्म आणि आहार” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजनात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने आणि प्र. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यशाळेस एकूण 51 सहभागी उपस्थित होते. ज्यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांचा सक्रिय सहभाग लाभला. कार्यशाळेतील सर्व सत्रांना अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मानवनिर्मित व प्राकृतिक विज्ञान, आजारांचे संभाव्य कारण, सेवा व सुमिरन या विषयांवर जया काळे यांनी सुबोध व विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. योगाभ्यास, आदर्श आहार, प्रोटीनसंबंधी गैरसमज-समज, हॉर्मोनल आरोग्य व जीवनशक्ती याबाबत योगतज्ञ स्नेहल काळे यांनी सखोल माहिती देत प्राणायाम आणि आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यशाळेदरम्यान आहारामध्ये कच्च्या भाज्या व फळांपासून तयार करण्यात आलेले आरोग्यवर्धक, स्वादिष्ट व नाविन्यपूर्ण पदार्थ सहभागींना पुरविण्यात आले.
सर्व सहभागींच्या अभिप्रायानुसार ही कार्यशाळा आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करणारी आणि आहार-आरोग्य यातील परस्परसंबंध अधिक स्पष्ट करणारी ठरली. ही कार्यशाळा आरोग्याकडे अधिक सजगतेने व सर्वांगीण दृष्टीने वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरली. या कार्यशाळेमुळे आहार व आजार यामधील अंतःसंबंधाची सखोल जाणीव झाली, असा सकारात्मक आणि आशादायक प्रतिसाद सहभागींकडून प्राप्त झाला.